शंकरराव चव्हाण यांना भारतरत्न द्या; कुणबी मराठा महासंघाची मागणी

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान केल्यानंतर राव यांचे काँग्रेसमधील सहकारी, माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांनाही मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी कुणबी मराठा महासंघाच्या मेळाव्यात एका ठरावाव्दारे करण्यात आली. गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यास शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्य भावना गवळी उपस्थित होत्या.

अशोक चव्हाण भाजपावासी झाल्याचे निमित्त तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत शंकरराव चव्हाण यांच्या विषयी काढलेल्या गौरवोद्गाराच्या पार्श्वभूमीवर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शंकररावांचा मरणोत्तर सन्मान व्हावा, अशी त्यांच्या पुरोगामी मराठा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनुयायांची अपेक्षा आहे. या मागणीसाठी आम्ही राज्य सरकारकडेही आग्रह धरणार आहोत, असे वरील मेळाव्याचे संयोजक व राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांनी येथे स्पष्ट केले.

Protected Content