भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेपाळच्या बस अपघातात जखमी झालेल्या सात जणांना घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे मुंबई येथे परत आले असून या जखमींवर बाँबे हॉस्पीटलमध्ये उपचार होणार आहेत.
नेपाळ येथे बस अपघाताची माहिती समोर येताच केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, परिक्षीत बऱ्हाटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तात्काळ नेपाळला प्रस्थान केले होते. मयत झालेल्यांच्या पार्थिवासोबत रक्षाताई आणि आ. सावकारे हे भारतात परतले. तर भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे मात्र जखमींसोबत तेथेच राहिले. जखमींपैकी ज्यांना विमान प्रवास करता येईल अशा सात स्त्री-पुरूष यात्रेकरूंना घेऊन काल रात्री इंडिगो विमानाने अमोल जावळे, गोलू पाटील व केदार ओक हे मुंबईला पोहचले.
या सातही जखमींवर बाँबे हॉस्पीटलमध्ये उपचार होणार असून याचा पूर्ण खर्च उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमात्ूान करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी दिली आहे. कुमुदिनी रवींद्र झांबरे, वर्षा भंगाळे, हेमराज राजाराम सरोदे, रूपाली हेमराज सरोदे, निलीमा भिरूड, भारती रवींद्र पाटील व सुनील जगन्नाथ धांडे या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी माहिती देतांना सांगितले की, सर्व जखमींवर ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निर्देशानुसार बाँबे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या सर्वांच्या संपर्कात ना. गिरीशभाऊ महाजन, ना. रक्षाताई खडसे व आ. संजयभाऊ सावकारे हे आहेत. तर या कामात आरोग्य सेवक रामेश्वरभाऊ नाईक यांचे सहकार्य लाभल्याचे देखील त्यांनी नमूद केले.