मुंबई महानगरपालिकेच्या लिपीक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जाणार असून या पदासाठी मुंबई महापालिकेने ठेवलेल्या जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‘कार्यकारी सहायक’ पूर्वीचे पदनाम: लिपिक या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मात्र ही भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही लिपिक पदाला अशी अट नव्हती.

युपीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अशी अट कधीच नव्हती, असे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे यांनी व्यक्त केले आहे. ही अट काढून टाकावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या अटीविरोधात शिवसेना ठाकरे गटानेही संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे, ही जाहिरातीमधील जाचक अट रद्द करावी अशी मागणी केली आहे.

Protected Content