रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मेहुण मंदिराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे.अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या या पवित्र स्थळाला मंत्री गिरीष महाजन यांच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीचा वापर भक्तिनिवास, पेव्हर ब्लॉक, सभामंडप आणि घाटाचे बांधकाम करण्यासाठी होणार आहे. यापूर्वीही मंत्री महाजन यांच्या प्रयत्नांमुळे २ कोटी रुपये निधी मिळाला होता,ज्यामुळे या परिसरात विकासकामे सुरु झाली आहे.
या सर्व प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा निधी मंजूर झाला आहे. वारकरी संप्रदायात यामुळे आनंदाचे वातावरण असून, या ऐतिहासिक मंदिराच्या विकासासाठी उचललेल्या पावलाबद्दल त्यांनी मंत्री गिरीष महाजन आणि नंदकिशोर महाजन यांचे आभार मानले आहेत. या निधीमुळे भक्तांना अधिक सुविधा मिळतील आणि मंदिर परिसराचा विकास होऊन येथील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.