मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पहिले दोन हप्ते राज्यभरातील महिलांना देण्यात आली आहेत. पहिल्या दोन महिन्यांची एकत्रित ३००० रुपये रक्कम रक्षाबंधनापूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात सरकारने 3000 रुपये जमा केले. पण, अनेक बहिणींची खात्यामधील रक्कम पाहून निराशा झाली होती. बँकानी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे ५०० ते १००० रुपये आले होते. त्यामुळे काही महिला आणि बँक कर्मचारी यांच्यात वाद-विवाद झाला. अनेक महिलांना बँकांचे नियम माहिती नसल्याने हा प्रकार घडला होता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, अशी सूचना महिला आणि बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आली आहे. या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. बँक अकाऊंटमध्ये नियमानुसार किमान रक्कम न ठेवल्यास ग्राहकांना नॉन मेंटेनन्स दंड लावतात. त्यामुळे बँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवणे गरजेचे असते. मात्र अनेकांना हे माहीत नसते. त्यामुळे बँक अकाऊंटमधील रक्कम मिनिमम बॅलेन्सपेक्षा कमी झाल्यास बँक दंड आकारण्यास सुरुवात करतात. या कारणामुळे राज्य सरकारने खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले तरी ‘मिनिमम बॅलेन्स’ नियमांची पूर्तता न करणाऱ्या महिलाच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात कमी रक्कम जमा झाली होती. पण आता राज्य सरकारने बँकांना पैसे कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.