पिंपरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिंपरीजवळ मोशी इथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थी इंद्रायणी नदीत बुडाले आहेत. ही मुले बुडाल्यानंतर त्यांना शोधून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. यासोबतच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमलाही बोलावण्यात आले होते. अग्निशमन दलाचे जवान आणि या रेस्क्यू टीमने तीनपैकी दोघांना बाहेर काढले आहे. या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. जय दायमा आणि ओमकार पाठक अशी या मुलांची नावे आहेत. इंद्रायणी नदीकाठी ही मुले जल पूजनासाठी गेली होती असे कळते आहे.
मोशी-आळंदी रस्त्यावर असलेल्या वेदश्री तपोवन या निवासी गुरुकुल संस्थेतील 50 ते 60 मुले इंद्रायणी नदीच्या काठी जल पूजनासाठी गेली होती. मोशीतील तापकीर नगर इथे हा कार्यक्रम निवासी शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता असे सांगितले जात आहे. जल पूजन करत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला होता. तो बुडताना पाहून त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही जण पाण्यात बुडाले. या दुर्घटनेनंतर गुरुकुलाची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे.