कोर्ट रूममध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने वकिलाचा दुदैवी मृत्यू

नागपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपुरात एका वकिलाचा आपल्या कर्मभूमीत धक्कादायक शेवट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तलाट इक्बाल कुरेशी नेहमीप्रमाणे सत्र न्यायालयात आले होते. आज त्यांची केस होती. मात्र युक्तिवाद सुरू होण्यापूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. वकिलाच्या निधनाने कोर्टात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुरेशी यांनी युक्तिवादापूर्वी कोर्ट रूममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वत: न्यायाधीश वकिलाला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र वकिलाला वाचवता आलं नाही.

court

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.30 वाजता कुरेशी जिल्हा न्यायालयात पोहोचले.सातव्या मजल्यावरील सीनियर डिव्हिजन न्यायाधीश एस.बी. पवार यांच्या न्यायालयात त्यांची केस होती. यावेळी विरोधी पक्षाचे वकील धनराजानी युक्तिवाद करीत होते, तेव्हाच कुरेशी बाकावरून खाली कोसळले. ते बेशुद्ध झाल्याचं दिसताच न्यायाधीश पवार तातडीने आपल्या जागेवरून उठले आणि कर्मचाऱ्यांना त्यांना पाणी द्यायला सांगितलं. यानंतर न्यायाधीश पवार स्वत: त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. स्ट्रेचर उपलब्ध नव्हता. त्यामुळे कुरेसी यांना खुर्चीवर बसवून खाली आणण्यात आले. न्यायाधीशांनी आपल्या गाडीतून कुरेशी यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी यांच्या पत्नीचे कोरोनामध्ये निधन झाले होते. तेव्हापासून कुरेशी एकटे राहत होते. दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. कुरेशी यांच्या अचानक झालेल्या निधनाने न्यायालयात वकिलांनी शोक व्यक्त केला आहे.

Protected Content