मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. मात्र दर्शनसाठी त्यांना तासनतास दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. यावर तोडगा काढण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. त्यानुसार दर्शन मंडप स्कायवॉकची संकल्पना समोर आली. त्यानुसार हा स्कायवॉक तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभा करायला राज्य सरकारच्या उच्च अधिकार समितीने मान्यता दिली आहे. त्यासाठीचा ११० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याला आता मान्यता देण्यात आली आहे.
या आराखड्यातून दर्शन मंडप स्कायवॉक तयार करून टोकन पद्धतीचे दर्शन सुरू केले जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १२९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. यापैकी आता 110 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली. त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे लाखो भाविकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. शिवाय अनेक वर्षापासून दर्शन रांगेत ताटकळत उभे राहण्यीच वेळ वारकऱ्यांवर येणार नाही.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. यानुसार आता नवीन दर्शन मंडप पंढरपुरात उभा करण्यात येणार आहे. शिवाय तीन महिन्यानंतर होणाऱ्या कार्तिकी यात्रेत प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शनव्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कार्तिकीवारीत दर्शनासाठी वारकऱ्यांना ताटकळत रहावे लागणार नाही असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.