पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर पहूरपेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित सभेत पहूर शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी लाईव्ह ट्रेन्डस न्युजचे प्रतिनिधी व आर.एल. न्युज चे संपादक रवींद्र भीमाशंकर लाठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जयंत मुकुंदराव जोशी यांची तर शंकर रंगनाथ भामेरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार शांतारामआप्पा लाठे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सकाळी ११ वाजता सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांसह दिवंगताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रविण कुमावत यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला . ते म्हणाले, ३ निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या वाघुर नदीवरील पुलाचे रखडलेले काम त्वरीत पूर्णकरण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष या सामाजिक विषयाकडे वेधले.
अखेर नाईलाजाने पत्रकार बांधवांना ‘रास्ता रोको’ आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागले. सदर पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले .या प्रसंगी मावळते उपाध्यक्ष शरद बेलपत्रे, माजी अध्यक्ष रवींद्र घोलप, मनोज जोशी, गणेश पांढरे, सादिक शेख यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा याप्रसंगी स्नेह वस्त्र गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच मावळत्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुद्रित पत्रकारिता क्षेत्रात नव्यानेच पदार्पण केलेल्या हरिभाऊ राऊत व संतोष पांढरे यांना सन्मानित करण्यात आले. संजीव पाटील, रामेश्वर पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. डॉ. संभाजी क्षीरसागर, संपादक किरण जाधव यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी तर हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले.