सावधान ! म्हाडाची आली आहे फेक वेबसाईट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हाडा (Mhada) https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असल्याने म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याने, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा देत आवाहन केले आहे की, सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.

काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत सदर अज्ञात व्यक्तींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीस बनावट संकेतस्थळ व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली व त्यांनी म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी रु. 50,000 इतकी रक्कम या बनावट संकेतस्थळावरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आली. तसेच याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे.

Protected Content