धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निसर्गाशी तादात्म्य पावणारे कवी म्हणून बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी साहित्यात अजरामर झाले. त्यांची कविता आनंद पेरणारी असली तरी तिच्यात आंतरीक दुःखाची वेदना दडलेली होती. जीवनाच्या सर्व अनुभवांना त्यांनी कवितेत मांडले. त्यांची कविता निसर्गासी संवाद साधणारी होती, असे प्रतिपादन साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. ते पी. आर. हायस्कूल आयोजित बालकवी जयंती समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डॉ. ए. सी. शिरसाठ होत्या.
कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रभाकर नेरपगार, वं. दे. लोहार, वासुदेव पाठक, बी. डी. शिरसाठ, डि. एस. पाटील, व्हि. एच. चौधरी, एस. डी. मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बालकवींच्या कवितांचे सौंदर्य उलगडून दाखविले. वं. दे. लोहार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वासुदेव पाठक यांनी पाऊस कवितेचे सादरीकरण केले. मुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी बालकवींच्या कवितेतली गेयता सांगत त्यांच्या गेय कवितांची ओळख करुन दिली. कार्याध्यक्ष डि. एस. पाटील यांनी साहित्य कला मंचच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. मंचच्यावतीने लवकरच एक दिवसीय कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक एस. डी. मोरे यांनी केले. सुत्रसंचलन बी. डी. शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी पर्यवेक्षक व्हि. एच. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला पी. डी. महाजन, आर. जे. धनगर, आर. एल. पाटील, आर. एम. ठाकरे, जी. यू. सोनवणे, वाय. ए. पाटील. एन. वाय. शिंदे, सौ. एस. व्ही. तायडे, सौ. व्हि. एम. सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रविण तिवारी, राजेंद्र पवार, नितीन बडगुजर यांनी परिश्रम घेतले.