मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या मार्गदर्शनाबाबत विशेष शिबिर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाज कल्याण विभागातर्फे जळगावात मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’बाबत महसूल पंधरवड्यानिमित्त विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांना योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. तर मंचावर सहाय्यक लेखाधिकारी संजय कट्यारे, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे, समाज कल्याण निरीक्षक आर. सी पाटील उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेमधून राजेंद्र कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यानंतर योगेश पाटील यांनी तीर्थ दर्शन योजनेची व्याप्ती, त्याची माहिती, लाभार्थींची निवड कशी होते, त्याचबरोबर योजनेचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले.

आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले.

या वेळेला विविध महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती दिली. प्रश्नोत्तराद्वारे त्यांनी योजनेचे स्वरूप समजून घेतले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याविषयी उत्सुकता दाखवली. सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी करून आभार मानले. कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content