मुसळधार पाऊसामुळेही नाशकात पाणीबाणी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकिकडे मुसळधार पाऊस, भरलेली धरणे तर दुसरीकडे तहान भागवण्यासाठी सहा तालुक्यांतील ४५७ गाव-वाड्यांना १११ टँकरमधून पाणी पुरवठा. यंदाच्या पावसाळ्यात अशी विरोधी परिस्थिती दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, त्या चांदवड, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला आणि नांदगाव तालुक्यात आजही टँकरने तहान भागवावी लागत आहे.

प्रारंभीचे दीड महिने ओढ देणाऱ्या पावसाचे नंतर बहुतांश भागात आगमन झाले. ऑगस्टच्या सुरुवातीला कोसळलेल्या पावसाने संपूर्ण चित्र पालटले. एक जून ते सहा ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५३५ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी आतापर्यंत ५२० मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या ९७.३ टक्के पाऊस झाला. तीन, चार दिवसांत मोठी तफावत भरून काढली. १५ पैकी केवळ तीन म्हणजे नाशिक (८५ टक्के), इगतपुरी (६० टक्के), पेठ (९५ टक्के) या तालुक्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. उर्वरित १२ तालुक्यांत सरासरीच्या १०६ ते १७७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाल्याची आकडेवारी आहे.

यामध्ये ज्या तालुक्यात टँकर सुरू आहे, त्यांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पावसामुळे लहान-मोठ्या २२ धरणांमध्ये सध्या ४० हजार ४६० दशलक्ष घनफूट म्हणजे ६१.६२ टक्के जलसाठा झाला. चार धरणे तुडुंब भरली असून नऊ धरणांतील जलसाठा ७५ टक्क्यांहून अधिक आहे. अनेक धरणांमधून विसर्ग करावा लागला. या स्थितीत अनेक गाव-पाडे अद्याप तहानलेली आहेत, हेच प्रशासकीय अहवालातून समोर आले.

Protected Content