बांग्लादेश हिंसाचारामुळे कांदा निर्यातीला फटका

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला आहे. या हिंसाचारात अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. बांगलादेशातील अराजकतेनंतर या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. याचा फटका कांदा निर्यातीला बसला आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती. मात्र आता येथील हिंसाचाराचा फटका कांदा निर्यातीला बसला आहे.

बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. मात्र या हिंसाचारामुळे दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका थेट भारतातील शेतक-यांना बसत आहे. कांद्याची निर्यात रखडल्यामुळे शेतक-यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. यामुळे बाजारपेठेत कांद्याचे दर देखील वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Protected Content