बांग्लादेशात अडकले १९ हजार भारतीय नागरिक; परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत माहिती दिली. जयशंकर म्हणाले की, बांगलादेशात सध्या सुमारे १९ हजार भारतीय नागरिक अडकले असून त्यापैकी ९ हजार विद्यार्थी आहेत. जयशंकर म्हणाले की, केंद्र सरकार बांगलादेशातील भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहे. बांगलादेशातील अशांततेने हिंसक वळण घेतल्यानंतर शेजारच्या देशात राहणारे बहुतांश भारतीय विद्यार्थी जुलैमध्ये मायदेशी परतले होते.

आम्ही आमच्या राजनैतिक मिशनच्या माध्यमातून बांगलादेशातील भारतीय समुदायाशी जवळून आणि सतत संपर्कात आहोत. तेथे अंदाजे १९,००० भारतीय नागरिक असून त्यापैकी सुमारे ९००० विद्यार्थी आहेत. जुलैमध्ये बहुतांश विद्यार्थी परतले, असे त्यांनी आज संसदेत सांगितले. बांगलादेशात राहणाऱ्या अल्पसंख्याकांच्या संदर्भात भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध गट आणि संघटनांनी पुढाकार घेतल्याच्या बातम्या आहेत. साहजिकच कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत आम्ही चिंतेत राहू, असे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Protected Content