वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास शासनाकडून मान्यता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वरणगांव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. राज्य राखीव पोलीस बलातील कंपन्याची राज्यात कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताकरिता तसेच नक्षल बंदोबस्ताकरिता वेळोवेळी मागणी करण्यात येते.

सर्व साधारण बंदोबस्ताचा मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता, राज्य राखीव पोलीस बलाचे अधिकारी व अंमलदार हे वर्षामधील २३० ते २४० दिवस राज्य व राज्याबाहेरील निवडणूक बंदोबस्त, नक्षल बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था यासारख्या महत्वाच्या बंदोबस्ताकरिता तैनात असल्याचे दिसून येते. तसेच गडचिरोली येथे नवीन पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात येतात, त्यावेळेस अतिरिक्त कंपन्यांची मागणी करण्यात येते. उक्त बार्बीचा विचार करता राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बंदोबस्ताचा ताण वाढल्यामुळे त्यांना त्यांचे काम प्रभावीपणे पार पाडणे शक्य होत नाही. याकरिता राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाने संदर्भाधीन क्र.१ च्या दि.०७.१२.२०२३ रोजीच्या पत्राद्वारे वरणगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गट निर्माण करण्याची विनंती केली आहे. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने संदर्भाधीन क्र. १ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार उक्त गटाकरिता शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण १३८० पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उक्त पदनिर्मितीचा प्रस्ताव विहित पद्धतीने उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येईल.

तसेच उक्त नवीन गट निर्माण करण्यास व त्यासाठी येणा-या रु.६३.६९.९६.५४०/-(रुपये त्रेसष्ट कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार पाचशे चाळीस फक्त) इतक्या आवर्ती खर्चास व उक्त शासन निर्णयासोबतच्या “परिशिष्ट-ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे रु.१५२,२६,२३,४०४/- (रुपये एकशे बावन्न कोटी सव्वीस लाख तेवीस हजार चारशे चार फक्त) इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. उक्त खर्च हा “गृह विभाग, मागणी क्र.बी-१, २०५५ पोलीस, ०१६८ जिल्हा पोलीस बल” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

Protected Content