अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मंगळवारी तोडफोड करण्यात आली, याप्रकरणी दोन मनसैनिकांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. मिटकरी यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक केली आहे. साबळे हे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अटकेची कारवाई केल्यानंतर दोघांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्य सूत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरारच अहेत. दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुनबळे यांच्यासह १० आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.