मद्यधुंद बसचालकाने ५ वाहनांना दिली धडक; दोन जणांची प्रकृती गंभीर

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात मंगळवारी मध्यरात्री एका मद्यधुंद बसचालकाने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. तर चार पाच नागरिक हे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे. ही घटना कोथरूड येथील वनाज कॉर्नर येथे मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.

मंगळवारी २३ जुलै रोजी रात्री कोथरूड येथील वनाज कॉर्नर जवळ कोथरूड डेपोकडून एक खासगी बस भरधाव वेगात आली. यावेळी बस वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने वनाज मेट्रो स्थानकाजवळ चार ते पाच वाहनांना ही बस धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर झाला. तर काही नागरिक जखमी झाले. एका दुचाकीस्वारांच्या गळ्यात लोखंडी सळई घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. मोठा आवाज झाल्याने तसेच एक बस चार ते पाच वाहनांना धडकल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बस चालकाला पकडले. बाळू बाळासाहेब थोरात असे बस चालकाचे नाव असून तो दारूच्या नशेत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content