मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष ठरला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. अजिंक्य नाईक यांना एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार गटाचा पाठिंबा होता. त्यांनी संजय नाईक यांचा १०७ मतांनी पराभव केला आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना २२१ तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांना ११४ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ३३५ जणांनी मतदान केलं होतं. नाईक विरुद्ध नाईक झालेल्या या थेट लढतीमध्ये अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत.
अजिंक्य नाईक हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे जावई असून एमसीएचे विद्यमान सचिव होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे यापूर्वीचे अध्यक्ष अमोल काळे यांचे टी-२० वर्ल्ड कप मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यासाठी ही निवडणूक झाली. अमोल काळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. भारतीय क्रिकेटची मुंबई पंढरी मानली जाते. त्यामुळे या असोसिएशनच्या अध्यक्षपदाला मोठं महत्त्व आहे. अमोल काळे यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत २५ मतांनी पराभव केला होता.