नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पारडी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. योगेश्वर भगत चुटे असे मृताचे नाव आहे. उड्डाणपुलावरून अचानक तरूण खाली पडल्याने सर्वानाच धक्का बसला. खाली पडलेला योगेश गंभीर जखमी झाला. उड्डाणपुलावर नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी योगेशचे नियंत्रण सुटून त्याची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली असावी. त्यात योगेश खाली पडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. वा पुलावर एखाद्याने कट मारल्याने नियंत्रण सुटून गाडी पुलाच्या कठड्याना धडकून योगेश खाली पडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धडक एवढी भीषण होती की, योगेश्वर उड्डाणपुलावरून फेकला गेला आणि खाली जमिनीवर पडला. त्याला वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेत पोलिसांशी संपर्क साधला. पारडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. योगेशला गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. योगेश नागपुरातील सुभान नगर, इंदिराबाई तिडके काॅलनीत राहात होता. तो भारत फायनान्समध्ये काम करीत होता.
उल्लेखनीय बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच नागपुरात निसरड्या रस्त्यांवरून घसरल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रदीप किरण दिंडमुढे हे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ठार झाले. सक्करदरा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुसऱ्या घटनेत शोहेब बरकाती शेख हे दुचाकी घसरून खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत आधी मेडिकल व नंतर खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. तेही दगावले.