मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार उभे असल्याने आज मतदान घेण्यात आले. मतदान पूर्ण झाल्यानंतर लागलीच मतमोजणी करण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार हे पहिल्याच फेरीत निवडून आले. यात पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांचा विजय झाला. यासोबत शिवसेनेचे भावना गवळी व कृपाल तुमाणे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा देखील विजय झाला. यासोबत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचाही पहिल्या फेरीत विजय झाला.
दरम्यान, पहिल्या फेरीत पुरेशी मते न मिळाल्याने ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर आणि शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांच्यासाठी दुसर्या पसंतीची मते मोजण्यात आली. यात तीन मते अधिक मिळवून मिलींदा नार्वेकर हे विजयी झाले. तर शेकापचे जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, आजच्या निवडणुकीत कॉंग्रेसची सात ते आठ मते फुटल्याचे दिसून आले. तर कॉंग्रेसच्या आमदारांपैकी दोघांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना दुसर्या पसंतीची मते दिल्याचेही दिसून आले.