जळगाव (प्रतिनिधी) झारखंड राज्यातील सराईकेला जिल्ह्यातील धातकीडीह गावात मुस्लीम युवक तबरेज अंसारीची जमावाने चोरीच्या आरोपाखाली निर्घृण हत्या केली होती. संबंधित आरोपींविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी आज मुस्लीम संघटनांकडून निषेध आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झारखंड राज्यातील वरील विषयात नमूद मृत तबरेज अंसारी यास चोरीच्या आरोपाखाली जमावाने बेदम मारहाण तर केलीच. परंतु त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी घोषणा देण्यास त्याला प्रवृत्त करण्यात आले. तबरेज याला रात्रभर अमानवीय मारहाण करून सकाळी त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी तबरेजची प्रकृती खालावलेली असतांना देखील त्यास स्ट्रेचरचा वापर न करता त्याला पायी चालवून दवाखान्यात नेले. दवाखान्यात उपचारादरम्यान तरबेजचा मृत्यु झाला. त्यामुळे या घटनेतील सर्व दोषींवर हल्लेखोरांवर व ज्या पोलीस दलातील कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच तबरेजचा मृत्यु झाला आहे. अशा सर्वांवर कारवाई करावी. सदर घटनेबाबत व दवाखान्यात तबरेजचा,पोलीस घेऊन जात असतांनाची व्हिडीओ फुटेज सोशल मिडीयावर उपलब्ध आहे, असे कृत्य वारंवार मागील काही वर्षात घडत असून अशा प्रकारच्या घटना हे भारतीय एकात्मता व अस्मितेसाठी धोका निर्माण करणारी आहे. अशा प्रकारच्यला घटनेतून समाजात नकारात्मक बाबी जात असून धार्मिक द्वेष निर्माण होत आहे. तरी सदर घटनेची सखोल चौकशी होऊन वरील घटनेत दोषी असलेल्या आरोपी विरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,असे म्हटले आहे. एमआयएमने दिलेल्या निवेदनावर सानिर सय्यद, नईम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर आशयाचे निवेदन ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन’ च्या वतीने देखील देण्यात आले आहे. या निवेदनावर रेय्यान जहांगीरदार आणि जिया बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.