शरद पवारांनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट; विधानपरिषद निवडणूकीत खेळी होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमदारांची घसरलेली संख्या तसंच बदलेली समीकरणं यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यातच आगामी विधानसभेपूर्वी होणारी ही शेवटची निवडणूक असल्यानं दोन्ही आघाडीकडून आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यातला बहुजन विकास आघाडी हा महत्त्वाचा पक्ष आहे. या पक्षाचे तीन आमदार आहेत. सध्या त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे. पण,पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट सामना झाला होता. त्यामध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि ठाकूर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या भेटीनंतर ठाकूर काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही जय्यत तयारी सुरु केली आहे. वडणुकीच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर या पक्षाकडं हक्काची 43 मतं आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी 3 मतांची आवश्यकता आहे.

Protected Content