मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील केईएम रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांच्या रिपोर्ट्सचे पेपर प्लेट्स बनवले जात असल्याचा प्रकार उघड झाली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची गंभीर दाखक घेतली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांना केईएम प्रशासनाला याबाबत जाब विचारला आहे.
केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्ट्सचे पेपर प्लेट्स बनवले जात असल्याचा व्हिडीओ सामोर आला होता. या व्हिडीओवर स्पष्टपणे रुग्णालयाचं नाव आणि जे रुग्ण होते त्यांचं नाव दिसत आहे. एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट गोपनीय ठेवण्याची जबाबदारी त्या रुग्णालयाची असते. त्याच्या नातेवाईकांना ते रिपोर्ट्स दिले जातात. मात्र आता याच रिपोर्ट्सचे थेट पेपर प्लेट्स बनवले जात आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यांनी आधी ट्वीट करत ही माहिती उघड केली. त्यानंतर आज त्यांना केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांची भेट घेतली.
किशोरी पेडणेकर यांनी याबाबत म्हटलं की, यात एक गंभीर बाब समोर आली आहे. पेपर प्लेटसाठी रुग्णांच्या रिपोर्टचे कागद वापरले आहेत. यात नियम पाळले नाहीत. एकतर रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्टमधून पेपर प्लेटच्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे. सोमवारी यासंदर्भात पीआयएल दाखल होणार आहे. याप्रकरणी 6 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती रुग्णालय अधिष्ठातांनी दिली आहे. या घटनेचा निषेध करत मुंबई महापालिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. महापालिकेला भीक लागली आहे का? अशा शब्दात त्यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांचसोबत महापालिका आयुक्तांना भेटून पत्र देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.