अतिवृष्टी व अवकाळीची मदत १५ जुलैपर्यंत मिळणार- मंत्री अनिल पाटील यांची माहिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. परंतू अद्यापपर्यंत शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचे सांगून त्याची तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी आपला मुद्दा मांडत म्हणाले की, जानेवारी ते मे २०२४ दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला. याबाबतचा पंचनामा करण्याच्या सूचना राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करण्यात आला. त्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर पिकांचं नुकसान झालेआहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ जुलैपर्यंत ही मदत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत दिली.

सध्या एनडीव्हीआयची परभणी कृषी विद्यापीठाकडून कृषी विभागाच्या स्तरावर तपासणी केली जात आहे. एनडीव्हीआयची तपासणी पूर्ण झाल्यानंतर १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही पाटील म्हणाले. शेतकरी वगळू नयेत यासाठी एनडीव्हीआयचे नियम लागू करण्यात आले आहेत. एनडीव्हीआय तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या विभागातनं मदतीची मागणी केली त्या विभागाला आठ दिवसांत मदत दिली जाईल, असं आश्वासनही पाटील यांनी दिलं.

अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं हाताशी आलेलं पीक वाया गेली. शासनाकडून पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. राज्य सरकारने मदत जाहीर केलीय. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य नसल्याचं सांगत बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज आहे. मात्र सरकारनं पंचनामा करण्यात वेळ वाया घालवला. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. त्यामुळं खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. मात्र सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, असं थोरात म्हणाले.

Protected Content