खुशखबर ! ‘या’ तारखेपासून विठुरायांचे दर्शन २४ तास घेता येणार

पंढरपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वारकरी व विठ्ठल भाविकांसाठी खुशखबर असून पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन आता २४ तास घेता येणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त येत्या ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीच्यावतीने माध्यमांना ही माहिती देण्यात आली. आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे. याबाबत केलेल्या नियाोजनाची माहिती शेळके यांनी दिली. येत्या १७ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते वारकरी विणा, वाकरी पटका, श्रींची मुर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी (२५ जून) सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंदिर समितीने दिले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, अ‍ॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

Protected Content