मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे 48 नेते विधानसभेच्या 288 मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावर अद्याप चर्चा झालेली नसून देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडून याबाबत निर्णय घेतला जाईल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
लोकसभेला महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यासाठीच आता भाजपकडून डॅमेज कंट्रोल केले जात आहे. बावनकुळे म्हणाले, ”288 मतदारसंघात भाजपचे नेते दौरा करणार आहेत. लोकसभेत ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधानसभेसाठी आम्ही आता तयारीला लागलो आहोत”, असे बावनकुळे म्हणाले.
तसेच यावेळी बावनकुळे यांना महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ”महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल यावर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे आमचे आणि भाजपचे नेते आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित दादांचेही सरकार आहे. भाजपचे नेतृत्व फडणवीस आहेत. याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय होईल”, असे सूचक विधान बावनकुळेंनी केले आहे.