ग्रोधा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, गुजरातमधील गोध्रा येथे फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांमध्ये रिकाम्या जागा सोडण्याचे सांगून या रिकाम्या जागा सेंटर वरील शिक्षकांद्वारे योग्य उत्तरांनी भरल्या गेल्या. या कामासाठी शिक्षकाला मोठी रक्कम देण्याचा करार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये आरोपी शिक्षक तुषार भट्ट, शिक्षण सल्लागार कंपनी रॉय ओव्हरसीजचे परशुराम रॉय आणि गोध्रा येथील जलाराम शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. या शाळेत ५ मे रोजी नीट-युजी परीक्षा झाली होती.
गोध्राचे एसपी हिमांशू सोलंकी म्हणाले की, या नीट परक्षेतील या कॉपी घोटाळ्याची माहिती ही पंचमहालच्या जिल्हाधिकाऱ्यांना आधीच मिळाली होती. याबाबत परीक्षेच्या दिवशी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रांवर धाड टाकून शिक्षक तुषार भट्ट यांचा फोन तपासला होता. यात ३० विद्यार्थ्यांची यादी आढळून आली. अधिकाऱ्यांनी त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यांच्या गाडीत ७ लाख रुपयांची रोख सापडली.
त्यानंतर पोलिसांनी परशुराम रॉय यांना अटक केली. त्यांच्याकडून ८ कोरे धनादेश आणि २.३० कोटी रुपयांचा एक धनादेश जप्त करण्यात आला. एसपी म्हणाले की, अनेक धनादेश पालकांचे आहेत ज्यांची मुले जलाराम शाळेत नीट परीक्षेत बसली होती. रॉय यांनीच नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची ओळख शाळेतील शिक्षक आणि NTA ने नियुक्त केलेले परीक्षा उपअधीक्षक तुषार भट्ट यांच्याशी करून दिली होती. ‘नीट-यूजी’सारख्या स्पर्धा परीक्षांच्या आयोजनातील गैरप्रकार आणि अनियमितता सरकार खपवून घेणार नाही, तसेच त्रुटी आढळल्यास नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला जबाबदार धरले जाईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी इशारा दिला.