आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी गुरुवारी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. यावेळी उभयंतांत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली. तसेच आपले आंदोलन स्थगित करण्याचीही घोषणा केली.
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वेळ द्या, अशी मागणी करत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे. मात्र, आधी तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. सरकारच्या वतीने किमान महिनाभराचा कालावधीची मागणी या वेळी करण्यात आली. तर 30 जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, सरकारच्या विनंतीनुसार आता सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.