अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील धुपी गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचे बंद घरफोडून घरातील कपाटातून शेतमाल विक्री व दुकानासाठी लागणारे ५ लाखांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजता अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुभाष श्रीराम जाधव वय ५७ रा. धुपी ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ७ जून ते ११ जून दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कूलूप उघडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ५ लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १२ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजता शेतकरी सुभाष जाधव यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख हे करीत आहे.