जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नंदनवन नगरातील २७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी एकच गर्दी केली होती. दयावान गौतम सोनवणे वय २७ रा. नंदनवन नगर, रामानंद नगरजवळ, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील नंदनवन नगर परिसरात दयावान सोनवणे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जून रोजी रात्री जेवण करून तो राहत्या घरातील वरच्या खोलीत जावून झोपला होता. तर घरातील इतर सर्वजण घरात खालच्या घरात झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री दयावान याने वरच्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा लहान भाऊ कुंदन हा उठविण्यासाठी गेला असता त्याला भाऊ दयावान याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सोसे यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. दयावान याला आठ दिवसांपुर्वीच मुलगी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असतांना तरूणाच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.