मनोज जरांगेच्या भेटीला जात असताना बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. विजयानंतर बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात होते. या वेळी हा अपघात झाला. या अपघात त्यांच्या ताफ्यातील अनेक कार्यकर्ते जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक शहागड पुलाजवळ त्यांच्याच ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धकडल्याने हा अपघात झाला आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि भाजपला मोठा धक्का देत बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयात मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा मानला जातो. बीडमध्ये मराठा समाजाची निर्णायक मते मनोज जरांगे यांच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात गेल्यानेच त्यांचा हा विजय झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विजयी झाल्यानंतर लगेचच त्याच रात्री बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्याच ताफ्यातील एका दुसऱ्या वाहनाने सोनवणे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मात्र, त्यानंतरही बजरंग सोनवणे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

बीड लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत या निवडणुकीतील विजयाचे गणित मांडणे सर्वांनासाठी अवघड झाले होते. मात्र, या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आता होताना दिसत आहे. बीडमधील बजरंग सोनावणे यांचा विजय देखील मराठा आंदोलनामुळेच झाला असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर रात्री 2:30 वाजता भेट घेतली असल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली. या वेळी बजरंग सोनवणे म्हणाले की, यावेळी त्यांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 8 तारखेपासून मनोजदादांचे उपोषण देखील सुरू होत आहे. यादरम्यान पूर्ण ताकदीने सक्रिय राहण्याचा शब्द दिला. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती केली. न्यायहक्काच्या लढाईत सोबत असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य व शुभेच्छा घेऊन परतल्याचे समाधान वाटले.

Protected Content