भुवनेश्वर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशा म्हणजे नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचा (बिजद) बालेकिल्ला. २००० सालापासून या राज्यात बिजदचीच सत्ता होती. अगदी लोकसभा निवडणुकांमध्येही या राज्यात याच पक्षाची सरशी होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत नवीनबाबूंच्या या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा धक्का दिला. ओडिशातील लोकसभेच्या २१ जागांपैकी भाजपने २० जागांवर विजय मिळवला, तर बिजदला एकही जागा मिळाली नाही.
एकेकाळचा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बिजदची यंदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपबरोबर आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. मात्र जागावाटप आणि प्रदेश भाजप नेत्यांच्या विरोधामुळे दोनही पक्षांची आघाडी आकारास येऊ शकली नाही. त्यामुळे या राज्यात भाजपविरोधात बिजद अशीच लढत पाहायला मिळाली. ओडिशाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपने निवडणुकीत पटनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. २४ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या पटनाईक यांना मातृभाषा येत नसल्याचा मुद्दा भाजपने प्रचारात वारंवार मांडला. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवण्यात आल्या़ त्याचा फटका बिजद पक्षाला बसला़ केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा महत्त्वाच्या उमेदवारांनी ओडिशामध्ये विजय मिळवला.