बंगालमध्ये ममताच्या तृणमूलने जिंकल्या २९ जागा; भाजपचा १२ जागांवर विजय

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पश्चिम बंगालमध्ये २०१९च्या निवडणुकीत १८ जागा मिळवून सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या भाजपला यंदा पश्चिम बंगालच्या मतदारांनी धक्का दिला. राज्यातील ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २९ तर भाजपला १२ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. यामुळे बंगाली अस्मितेचा अभिमान बाळगणाऱ्या या राज्यामध्ये हिंदुत्वाची पताका आणखी उंचावण्याचे भाजपचे स्वप्न धुळीला मिळाले. काँग्रेसला केवळ मालदा दक्षिण येथे विजय मिळाला. डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नाही. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (डायमंड हार्बर), महुआ मोईत्रा (कृष्णानगर), सौगत रॉय (डमडम), माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (बेहरामपूर), कल्याण बॅनर्जी (श्रीरामपूर), शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), शताब्दी रॉय (बिरभूम), काकोली घोष दस्तिदार (बरसात) हे महत्त्वाचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे न्या. अभिजित गंगोपाध्याय तमलूक मतदारसंघातून विजयी झाले.

पश्चिम बंगालमध्ये पारंपरिकदृष्ट्या शक्तीची पूजा केली जाते. सरकार तृणमूल काँग्रेसचे असो किंवा त्याआधी डाव्या आघाडीचे किंवा त्याहीपूर्वी काँग्रेसचे, तिथे दुर्गापूजा नेहमीच उत्साहात साजरी केली जाते. भाजपने २०१९च्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्यानंतर तिथे रामनवमी आक्रमकपणे साजरी करण्यास सुरुवात केली. रामनवमीच्या आसपास होणारा हिंसाचार हा प्रकारही बंगालला नवीन होता. रामाच्या मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शक्तिपूजेला बंगाली अस्मितेचे स्वरूप देत भाजपची खेळी यशस्वी होणार नाही याची खबरदारी घेतली. भाजपला मागील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची २०२१च्या विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती करता आली नव्हती. तृणमूल काँग्रेसला २१५ तर भाजपला ७७ जागा जिंकण्यात यश आले होते. तोच कल लोकसभा निवडणुकीत कायम राहिला, किंबहुना तृणमूलने आपली कामगिरी अधिक उंचावली.

काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाण यांनी ७६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. ममता बॅनर्जी यांचे कठोर टीकाकार म्हणून चौधरी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यामुळेच आपण काँग्रेसबरोबर आघाडी करत नसल्याचे बॅनर्जी यांनी जाहीर केले होते. या विजयामुळे युसूफ पठाण जायंट किलर ठरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर संदेशखालीमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा उचलून भाजपने मोठा धुरळा उडवून दिला होता. मात्र, तिथे मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश आले नाही. संदेशखाली ज्या बसिरहाट मतदारसंघात आहे, तिथे भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यांना तृणमूलच्या एस के नुरूल इस्लाम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

Protected Content