सासऱ्याने दिलेल्या बुलेटने एटीएम फोडी करणाऱ्या कुख्यात चोरटयाला अटक

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सासऱ्याने दिलेल्या बुलेटने एटीएम फोडी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला गुन्हेशाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. मयुर अनिल कायरकर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो कुख्यात चोरटा असून त्याच्याविरुद्ध दोन डझनपेक्षा अधिक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर याला सासऱ्याने लग्नात बुलेट गिफ्ट दिली. या बुलेटने तो चोरीसाठी एटीएम शोधायचा. एटीएममध्ये अल्युमिनियमची पट्टी टाकायचा. एखादा नागरिक पैसे काढण्यास आला असता पैसे निघत नव्हते. तो एटीएममधून बाहेर निघताच मयुर हा आत जायचा. पट्टी काढल्यानंतर लगेच पैसे बाहेर यायचे. ते घेऊन तो पसार व्हायचा. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कडबी चौक परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये मयुर घुसला. त्याने तेथून पैसे काढले. एका नागरिकाला संशय आला. त्याने लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने बिनतारी संदेश यंत्रेणेद्वारे पोलिसांना सतर्क केले.

गुन्हेशाखेचे उपायुक्त निमित गोयल यांनी साहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांना चोरट्याला शोधण्याचे निर्देश दिले. पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हेशाखेचे संपूर्ण युनिट कामाला लागले. जरीपटक्यातून चोरी केल्यानंतर मयुरने पाचपावलीतील आवळे बाबू चौकातील पंजाब नॅशनल बँकेतही चोरीचा प्रयत्न केला. तो बुलेटने मानेवाडा परिसरात आला. गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. मयुरला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले.

Protected Content