जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एक्सप्रेसमधून रेल्वेतील परप्रांतीय प्रवाशांचे तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ६० हजारांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून चोरी करणाऱ्या चार जणांना एमआयडीसी पोलीसांनी रविवारी २ जून रोजी दुपारी ३ वाजता मेहरूण परिसरातून अटक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, रोहित विमल यादव वय २३ रा. बिहार हे दोन मित्रांसोबत रविवारी २ जून रोजी मुंबईहून पटणा येथे जण्यासाठी जनता एक्सप्रेसने निघाले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तिघेजण रेल्वेत झोपलेले असतांना तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चारही चोरटे हे जळगाव शहरातील असल्याचे समोर आले. त्यानुसार रेल्वे पोलीसांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरूजितसिंग सुजानसिंग बावरी वय २५ रा. तांबापुरा, शेख अजर शेख मजर वय २८ रा. सुप्रिम कॉलनी, सुधिर सुभाष भोई वय १९ आणि अल्ताफ फिरोज खान वय २० दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी यांना मेहरूण परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयितांना लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.