इटानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक निकालाच्या आधीच भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. १९ एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४६ जागांवर विजय मिळवला असून मागच्या टर्मचा स्वतःचाच रेकॉर्ड त्यांनी मोडला आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे, अरुणाचल प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा पेमा खांडू मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे ८२.९५ टक्के मतदान झाले. तर, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला सुरुवातीलाच १० जागांवर बिनविरोध विजय मिळाला. तर, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भाजपाच्या पारड्यात ४६ जागा गेल्या आहेत. तिथे बहुमतासाठी ३१ जागा गरजेच्या आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीने पाच जागा जिंकल्या आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने दोन जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने १ आणि अपक्षांनी तीन जागा जिंकल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर बसणार आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा तिसऱ्यांदा विजयी झाल्याने जल्लोष सुरू झाला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. भाजपाने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ १९ जागांवर निवडणूक लढवली. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांनीही अरुणाचल प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले. बोमडिला, चौखम, हायुलियांग, इटानगर, मुक्तो, रोईंग, सागले, ताली, तलीहा आणि झिरो-हापोली या मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे भाजपने १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.