नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर जिल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात वाकी ते गोसेवाडी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. वाकी ते गोसेवाडा रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत नागरिकांना बिबट्याचा मृतदेह आढळला.
स्थानिकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाच्या खापा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. खापा वनपरिक्षेत्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्रसंरक्षण प्राधिकरणाच्या नियमानुसार बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार वानखडे, डॉ. सुजित कोलगत, सहायक वनसंरक्षक विजय गंगावने, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले, मानद वन्यजीव संरक्षक प्रणेती लवंगे आणि श्रीकांत ढोबाळे यांच्यासह अन्य वनकर्मचारी उपस्थित होते.