Home धर्म-समाज रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी


रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ रोजी मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला अन् सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरली. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेस ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे, अशी माहिती शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

यंदा गडावर पाच जूनला सायंकाळी पाच वाजता धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला कशी असते, याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवासियांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, विटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गदका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.

त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound