५२.३0अंश देशाच्या राजधानीत आजवरच्या विक्रमी तापमानाची नोंद

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजधानी दिल्लीचे तापमान बुधवारी ५२.३ अंशांवर पोहोचले असून हा आजवरचा उच्चांक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केल्याने रस्त्यांवर संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळाला. वाढत्या तापमानामुळे विजेची मागणीही ८ हजार मेगावॉटपेक्षा अधिक झाली आहे. राजस्थानातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीचे तापमान वाढल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

मंगळवारी दुपारी दिल्लीचे तापमान ४९.९ अंशांवर जाऊन पोहोचले होते. बुधवारी दुपारी ४.१४ वाजता तापमापकाचा पारा ५२.३ अंशांवर जाऊन पोहोचला आणि राजधानीने तापमानाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. शहराच्या मध्यभागांपेक्षा सीमांवरील तापमान काहीसे अधिक नोंदविले गेले. राजस्थानातील वाळवंटावरून अतिशय उष्ण वारे दिल्लीकडे येत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भविल्याचे हवामान विभागाचे क्षेत्रीय प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तापमानात वाढ होत असताना बुधवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटे आणि ३२ सेकंदांना विजेची मागणी ८,३०२ मेगावॉटवर गेली होती. राजधानीत विजेची मागणी ८,३०० मेगावॉटपेक्षा अधिक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पॉवर डिस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे ८,२०० मेगावॉटपर्यंत मागणी जाईल, अशी वीज कंपन्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त मागणी असल्याने यंत्रणेवर मोठा ताण पडला.

Protected Content