आई-वडिलांच्या वादात मुलाने केली वडिलांची हत्या


छत्रपती संभाजीनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आई-वडिलांच्या भांडणात मुलाने वडिलांच्या पोटात चाकूने वार करून हत्या केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आला आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर छतावरून पडल्याचे सांगून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावरील चाकूच्या जखमामुळे हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला. ही घटना १० मे रोजी घडली असून इम्तियाज हुसेन असे मृताचे, तर हैदर इम्तियाज हुसेन असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, इरफान फातेमा इम्तियाज हुसेन या फिर्यादी आहेत. इम्तियाज हुसेन आणि इरफान फातेमा या दांपत्याला दोन मुली व एक मुलगा आहे. ते मजुरी करत होते. इम्तियाज आणि पत्नी इरफान फातेमा यांच्यात मद्याच्या व्यसनामुळे वाद होत असत. ३ मे रोजी त्यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी मुलगा हैदर तेथे आला. त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. तू आमच्या वादात पडू नकोस, येथून निघून जा असे इम्तियाजने त्याला सांगितले. त्यामुळे मुलाने वडिलांना घरात ढकलले व दरवाजा लावून घेत खिशातील चाकूने वडिलांवर वार केले. इम्तियाज यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर अंगावरील जखमा या छतावरून पडल्यामुळे नाही तर चाकूने भोसकून झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.