डीआरटी कोर्टाने महापालिकेची बँक खाती केले सील

जळगाव प्रतिनिधी । डीआरटी कोर्टाने महापालिकेची तीन बँकांमधील सर्व खाती सील केल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे महापालिकेचे सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत.

याबाबत वृत्त असे की, जळगाव नगरपालिका असताना घरकुल, पाणीपुरवठा योजनेंसह विविध विकास कामांसाठी हुडको या वित्तीय संस्थेकडून १४१ कोटी ३४ लाख रूपयांचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी आतापर्यंत ३३८ कोटींचा भरणा हुडकोकडे करण्यात आला आहे. यानंतर मात्र पालिकेने कर्ज भरणा थांबवल्याने हुडकोने डीआरटी न्यायालयात दाद मागितली होती. यात सुनावणी होऊन मार्च २०१४ मध्ये डीआरटी कोर्टाने महापालिकेला ३४१ कोटी रूपये अदा करण्याचे आदेश दिले होते. यानंतर एकरकमी परतफेडीचे प्रस्ताव देण्यात आले परंतु त्यात यातून तोडगा निघू शकलेला नाही. या अनुषंगाने उच्च न्यायालयाने आधीच्या डिक्री ऑर्डरला दिलेली स्थगिती उठवून खाते सील करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे महापालिकेच्या अलाहाबाद बँक, एचडीएफसी आणि अ‍ॅक्सीस बँकेतील खाते गोठविण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेचे व्यवहार ठप्प होणार आहेत. याआधी २०१४ मध्ये डीआरटी कोर्टाने महापालिकेचे तीन बँकांमधील सर्व खाते सील केली होती. तेव्हा ५० दिवस व्यवहार ठप्प होते. यानंतर आता नेमके किती दिवस व्यवहार ठप्प होतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत आज महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महापालिका उच्च न्यायालयात धाव घेणार असून आज आमदार राजूमामा भोळे हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.

Protected Content