जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयतर्फे कानळदा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकदिवसीय शिबिरात व गावात बालविवाह निर्मूलन अभियान अंतर्गत प्रबोधन करण्यात आले. यात विद्यार्थी, पदाधिकारी, ग्रामस्थांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देण्यात आली.
रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम. आयोजित युनिसेफ व स्मार्ट नवी दिल्ली द्वारा प्रायोजित बालविवाह निर्मूलनपर ‘ प्राधान्य द्या शिक्षणाला ; नकार द्या बालविवाहाला’ हे अभियान जळगाव तालुक्यातील वावडदा, पाथरी, कानळदा, लमांजन, वडली, वसंतवाडी या गावांमधील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. बालविवाहामुळे मुला- मुलींचे बालपण संपते. त्यांचे शिक्षण, आरोग्यावर दुष्परिणाम होतो, असे रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.चे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले. तसेच बालविवाह निर्मूलनासाठी चाइल्ड हेल्प लाइन क्रमांक १०९८ चा वापर करण्यात यावा, असेही आवाहन देशमुख यांनी केले. याबाबत आपले नाव व ओळख गोपनीय राहते, असेही त्यांनी नमूद केले.
विकासावर परिणाम
बालविवाहामुळे संबंधित मुला – मुलींच्या विकासावर परिणाम होतो. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. आपल्या परिसरात बालविवाह होत असेल, तर तो रोखण्याची एक सुजाण नागरिक म्हणून आपली जवाबदारी आहे, असे मत प्रा.विजय चौधरी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. राहुल पाटील यांनी व्यक्त केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावात ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ या विषयी जनजागृती केली. नंतर ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. या वेळी आर.जे.सुजाता, ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील, अश्विनी राठोड, विद्यार्थी, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ.श्रीकांत तारे यांचे मार्गदर्शन लाभले.