मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरकारी किंवा खासगी अनुदानित शाळा घरापासून एक किमी अंतरावर नसल्यास खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेता येईल. आरटीई प्रवेशाच्या नवीन बदलानुसार राज्यातील शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याअंतर्गत ७५ हजार २६४ शाळा सहभागी झाल्या आहेत. प्रवेशासाठी आता काही दिवसांत विद्यार्थी नोंदणी सुरु होईल, पण २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येवू शकतो. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग आता त्यासंदर्भात शासनाकडे विचारणा करणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळा नाही, त्यांना मात्र खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. पण, पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.