मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडिया स्टार नितेश कराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नितेश कराळे उत्सुक आहे. नितेश कराळे हे वर्धा तालूक्यातील मांडवा येथील शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे बीएससी, बीएड शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना यश प्राप्त झाले नाही. त्यानंतर त्यांनी पुणेरी पॅटर्न या नावाने स्पर्धा परिक्षेसाठी खासगी क्लास सुरू केली. त्यानंतर त्यांनी फोनिक्स अकादमी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थींनी त्यांच्याकडे प्रवेश घेतला होता. मात्र कोरोनामुळे सर्व काही बंद झाले. कोरोनामध्ये त्यांनी गुगल मीट, झूम मीटिंगच्या मदतीने क्लास घेण्यास सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गुरूजींनी यू-ट्यूबवर व्हिडीओ पोस्ट केले. त्यांनी वऱ्हाडी बोलीभाषेचा तडका देत कठीण गोष्ट सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितली.
गुरूंजींची ग्रामीण भाषेत शिकवण्याची शैली कुणाला पसंत पडली तर काहींनी टीकाही केली. भूगोल विषयातील खद् खद् हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ते त्यांच्या वऱ्हाडी शैलीमुळे लोकप्रिय झाले. प्रसिद्धीस आलेल्या कराळे गुरूजींनी अकादमीसोबत विद्यार्थी, शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. ते २०२० मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून ही उभे राहिले होते. या निवडणुकीध्ये कराळे गुरूजींना ८५०० मते मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित त्यांचा पक्षात प्रवेश झाला. यावेळी नितेश कराळे म्हणाले की, पवार व जयंत पाटील यांच्या प्रचंड आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील वाटचालीची सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे.
केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे. तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवेल आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्युब, फेसबुक, आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून मांडत राहील. कराळे यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस किशोर माथणकर, राजाभाऊ ताकसांडे, आफताब खान, कराळे गुरुजी, सुधीर कोठारी हे उपस्थित होते.