जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी रस्त्यावर दुचाकीच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर दोन गंभीर जखमी झाले आहे. अमोल अंबादास वडर (वय २४ रा.शेंदुर्णी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अमोल अंबादास वडर हा तरुण आपल्या परिवारासह जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे वास्तव्याला होता. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान मंगळवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता सुमारास अमोल हा त्याचे मित्र सुदाम कोळी व पवन कोळी यांच्यासह शेंदुर्णीकडे दुचाकीवरून जात होता. तेव्हा नेरी ते शेंदुर्णी रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे.
तेथील खराब रस्त्यांमुळे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात अमोल वडर याला डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यासह सुदाम व पवन कोळी यांनाही आजूबाजूच्या ग्रामस्थांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचार चालू असताना अतिदक्षता विभागात अमोल वडर याचा बुधवारी २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. तर सुदाम कोळी व पवन कोळी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.