जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रिंगरोड हरेश्वर नगरात पाणी भरण्यासाठी उठलेल्या महिलेचे घराच्या कंपाऊंडमध्येच हात-पाय बांधून अंगावरील दागिने ओरबाडून लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार आज पहाटे ४ वाजता घडला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंगरोड हरेश्वरनगरातील रहिवासी सुनीता सोनार (वय-35) या आज पहाटे चार वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मनपातर्फे पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पाणी भरण्यासाठी उठल्या होत्या. पिण्याचे पाणी भरून झाल्यावर टाकीत पाणी चढविण्यासाठी कॉक फिरवायला त्या कंपाऊंडमध्ये आल्या. तेथे पुर्वी पासूनच दबा धरून बसलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. काही कळायच्या आतच एकाने तोंड दाबले तर, दुसऱ्याने अंगावरील दागिने ओरबडून काढले. त्यात गळ्यातील पोत, गळ्यातील टॉप्स् आणि पायातील जोडवे लुटले. त्यानंतर दोघा भामट्यांनी सोनार यांचे तोंड व हातपाय बांधुन तेथून पळ काढला.
दिवस उजाडल्यावर सोनार कुटूंबीय झोपेतून उठल्यावर सुनीता या घरात दिसून आल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता त्या, कंपाऊंडमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यात. घटनेची माहिती तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना कळवल्यावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, प्रभारी अधिकारी संदिप अराक आणि डीबी पथकाने घटनास्थळावर धाव घेत पहाणी केली. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, भेदरलेल्या सुनीता सोनार यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.