अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते चोपडा रोडवरील रेल्वे पुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दिलीप अहिरे रा. म्हसदी धुळे ह.मु. पारोळा असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल अहिरे हा तरूण सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईजे ६५७८) ने मित्र देवेश लक्ष्मण सोनवणे रा. अमळनेर याच्या सोबत अमळनेरकडून चोपडा येथे कामाच्या निमित्ताने जाण्यासाठी निघाले. अमळनेर ते चोपडा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ समोरून येणारी अज्ञात मालट्रक ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला देवेश सोनवणे हा गंभीररित्या जखमी झाला. अपघात घडल्यानंतर मालट्रक चालक हा ट्रक घेवून पसार झाला. जखमीस अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.