मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने करण्यात आली होती. त्यातील काही आंदोलने हिंसक ही झाली होती. यानंतर त्या हिंसाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत होती. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा मूद्दा गाजला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्यात आली आहे.
राज्य शासनाने या एसआयटीचे प्रमुख म्हणून संदिप कर्णिक यांची नियूक्ती केली आहे. ते नाशिक शहराचे पोलिस आयूक्त आहे. या एसआयटीकडून आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमागे कोण आहे? तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला का? चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या गेल्या का? याचा शोध घेतला जाणार आहे.तसेच या एसआयटी चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच या पथकाला तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकार असणार आहेत.
उपरोक्त विशेष तपास पथकाने चौकशी करतांना राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरु असतांना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकी सारख्या हिंसक घटना जाणिवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे तसेच मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर करुन चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे, या व इत्यादी संदर्भात चौकशी करुन तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करावा.