जळगाव प्रतिनिधी । बांधकाम मजुराच्या मुलाने केलेल्या मारहाणीत बिल्डरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरातील वाघनगरात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघ नगरातील विवेकानंद विद्यालयाच्या समोर बांधकाम सुरू असून याचे बिल्डर बाबूलाल फुलचंद सैनी आहेत. शनिवारी सकाळी त्यांचा समतानगरात वास्तव्यास असणार्या विजय पाटील या मजुरासोबत वाद झाला. उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे लागते म्हणून त्याने बाबूलाल सैनी यांच्यासोबत वाद घालून तो तिथून निघून गेला. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजय पाटीलचा मुलगा दारू पिऊन साईटच्या ठिकाणी आला. त्याने सैनी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे ते खाली पडल्याने त्या तरूणाने पळ काढला. दरम्यान, सैनी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. क्षुल्लक कारणावरून थेट खून झाल्याच्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलीसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.